Awards & Functions
Convocation Function

kolhapur  March 19,2018

  

शिवाजी विद्यापीठचा 54 वा दीक्षांत समारंभ

कोल्हापूर- देशातील समृद्ध वारशाचा आधार घेऊन ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा नियोजित वापर करून भारताची विश्वगुरु ही जुनी ओळखच नव्याने दृढ करण्याचे आवाहन आज ज्येष्ठ अवकाश शास्त्रज्ञ आणि ‘इस्रो’चे माजी अध्यक्ष प्रा. ए. एस. किरणकुमार यांनी केले.


शिवाजी विद्यापीठाच्या 54 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. लोककला केंद्रात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे होते. अवकाश शास्त्रज्ञ प्रा. ए. एस. किरणकुमार यांच्या हस्ते प्रियांका पाटील या विद्यार्थिनीस सन 2017-18 मधील विद्यापीठाच्या सर्वसाधारण कौशल्यासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. वाई (जि. सातारा) येथील दीक्षा मोरे यांना एम. ए. संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल ‘कुलपती पदक’ देऊन गौरविण्यात आले. आजच्या दीक्षान्त समारंभात 50 हजार 444 स्नातकांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी आपल्या भाषणात शास्त्रज्ञ प्रा. किरणकुमार म्हणाले, समाजाच्या विकासात शिक्षणाचा मोठा वाटा आहे. आजच्या गतिमान युगात शिक्षणाची प्रक्रिया निरंतर आहे. या स्थितीत ‘लर्न-अलर्न-रिलर्न’ (शिका-विसरा-पुन्हा शिका) ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. असे सांगून निसर्ग हाच खरा महान शिक्षक आहे. आकाशात भरारी घेणाऱ्या गरूडाकडे पाहून एअरक्राफ्टची, तर शार्कपिनच्या रचनेनुसार जहाजाची निर्मिती झाली. समाजाच्या भल्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर होणे आवश्यक आहे. मात्र, समाजाचे भले करताना तंत्रज्ञानाचे शोषण करणे चुकीचे आहे.
प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमात विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचे वाचन केले. नवे जग वेगवान, स्पर्धेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच काही महत्त्वाची जीवनकौशल्ये, तंत्रकौशल्ये आत्मसात करावी लागणार आहेत, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी साडेअकरा वाजता शिवाजी विद्यापीठाचे परीक्षा विभाग नियंत्रक महेश काकडे यांच्या नेतृत्वात स्नातकांच्या समवेत दीक्षांत मिरवणुकीने ज्ञानदंड कार्यक्रमस्थळी आणण्यात आला. पसायदानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


शिवाजी विद्यापीठाच्या 54 व्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत प्रा. एन. डी. पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. शिवराम भोजे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, सचिव प्राचार्य शुभांगी गावडे,विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, अधिष्ठाता भारती पाटील, ए. एम. गुरव, डॉ. पी. एस. पाटील, ,पी. डी. राऊत, विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे,आदी मान्यवर उपस्थित होते. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. जनसंपर्क अधिकारी आलोक जत्राटकर, यांच्यासह धैर्यशील यादव,नंदिनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.